दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न पुरस्कार द्या.एस.एम.युसूफ़ यांच्यासह गायक कलाकारांची मागणी
राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय कला व सांस्कृतिक मंत्री यांना निवेदन
बीड (प्रतिनिधी) – दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना मरणोपरांत देशाचे सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह बीड शहरातील गायक कलाकारांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय कला व सांस्कृतिक मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हिंदी चित्रपट सृष्टीसह देशातील एकूण १४ भाषांसहित इंग्रजी भाषेत सुद्धा दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी आपल्या सुमधुर व कर्णप्रिय आवाजात गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. भारत देशातील प्रत्येक भाषेतील संगीतकारासोबत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. शिवाय गरीब निर्माते व संगीतकारांसाठी त्यांनी एक रुपयाही मानधन न घेता अनेक गाणी गायली आहेत. तर काही गाणी फक्त एक रुपया घेऊन गायली आहेत.
अशा या अवलिया व तहहयात माणुसकी जपणाऱ्या गायकाचे ३१ जुलै १९८० साली वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाला आता ४३ वर्षे होत आली असून येत्या ३१ जुलै २०२३ रोजी त्यांची ४३ वी पुण्यतिथी येत आहे. एवढा मोठा कालावधी उलटूनही त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही.
विशेष म्हणजे मोहम्मद रफी यांचे समकालीन किंवा त्यांच्या नंतरचे असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मात्र मोहम्मद रफी यांना भारतरत्न पुरस्कारासाठी अद्याप पर्यंत डावलण्यात आले आहे. हा फक्त त्यांचाच नाही तर कलेचा अपमान असून त्यांच्यावर अन्याय आहे.
आतापर्यंत या पुरस्कारासाठी मोहम्मद रफी यांची केलेली अवमानना लक्षात घेऊन निदान यावेळेस तरी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताचे औचित्त्य साधून त्यांना मरणोपरांत का होईना आपल्या भारत देशातील सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय कला व सांस्कृतिक मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली असून
निवेदनावर मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह शेख मुन्तखबुद्दीन, शेख मजहरुद्दीन, रतन सवाई, भास्कर वडमारे, संध्या भोसले, निशा उजगरे, महेश पाटील, विष्णू भंडारे, शकुंतला ससाने, शेख मुश्ताक अहेमद या स्थानिक गायक कलाकारांची नावे व सह्या आहेत.