भांडवलदारी पत्रकार संघटना, संघटनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप.
हे धोकेदायक असून पत्रकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे
मराठी पत्रकार परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
मुंबई- प्रतिनिधी/युसुफ खान पठाण /दुसरा वर्गबड्या भांडवलदारी मालकांच्या पत्रकार संघटना, संघटनेच्या कामाकाजात राजकीय हस्तक्षेप हे पत्रकारांसाठी धोकेदायक आहे. महाराष्ट्रात देखील मालक पुरस्कृत संघटनांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ज्या निपक्ष आणि तटस्थ पत्रकार संघटना आहेत त्या खिळखिळ्या करून टाकण्यासाठी संघटना फोडण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. भांडवलदारी मालक आणि सरकारचे हे षडयंत्र असून तात्कालिक लाभाला बळी न पडता यापासून पत्रकारांनी सावध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काल रात्री मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.
एस.एम.देशमुख सावधगिरीचा इशारा देत पुढे म्हणाले, काही मंडळी पत्रकारांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या चळवळीला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पत्रकारांचे आवाज बंद करण्याचे प्रयत्न विविध माध्यमातून होत आहेत. ज्यांना लोकशाहीची चिंता वाटते अशा सर्वांनी खंबरीपणे विरोध केला पाहिजे आणि सत्ताधारी व मालकांचे षडयंत्र मोडून काढले पाहिजे अन्यथा पत्रकारांची अवस्था ‘ना घरका, ना घाटका’ अशी होईल, असा सावधगिरीचा इशारा देत पत्रकारांच्या हिताची आणि हक्काची जपणूक हेच मराठी पत्रकार परिषदेचे उद्दिष्ट असून परिषद कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधू दिली नाही याचा परिषदेस अभिमान असल्याचे नमूद करीत परिषदेपुढील आव्हाने लक्षात घेता 85 वर्षाच्या संघटनेत हजारो सभासद जोडले जाणे ही अभूतपूर्व घटना असून परिषदेच्या कामासाठी प्रत्येकाने रोज एक तास योगदान द्यावे असे आवाहन केले.
मराठी पत्रकार परिषद आर्थिकदृष्ट्या सशक्त व्हावी व मुंबई कार्यालय सुसज्ज करता यावे यासाठी मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांनी 51 हजार, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर 25 हजार व परिषदेच्या महिला संघटक शोभाताई जयपूरकर यांनी 5 हजार रुपये व्यक्तीगत देणगी देत असल्याचे जाहीर केले.
आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण सोहळा चाकुर येथे होणार असून 8 मे 2012 रोजी पनवेल ते वर्षा अशी भव्य रॅली काढण्यात आली होती. अशी भव्य रॅली वातावरण निर्मिती व्हावी म्हणून पुणे ते चाकुर ‘एकता ज्योत रॅली’ काढण्याचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी यावेळी जाहिर करताच सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत एकता ज्योत रॅली यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडचे अधिवेशन दर्जेदार, यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ आणि पिंपरी-चिंचवडच्या संपूर्ण टीमचे यावेळी कौतुक व आभार मानण्यात आले. मुंबई मंत्रालय वार्ताहर संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश भांडेकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. येत्या 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त परिषदेच्या वतीने राज्यातील महिला पत्रकारांचा मुंबई येथे सन्मान करण्यात येणार असून या कामी महिला आघाडीच्या प्रमुख शोभाताई जयपूरकर, जान्हवीताई पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विश्वस्त किरण नाईक यांनी मार्गदर्शन करतांना तालुका संघांना बळकट करण्याचे आवाहन करीत सर्वच चळवळींसाठी रात्र वैऱ्याची असून सावधगिरीचा इशारा दिला. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, शरद काटकर, शिवराज काटकर, जान्हवीताई पाटील, महिला आघाडी प्रमुख शोभाताई जयपूरकर, विभागीय सचिव दिपक कैतके, रोहिदास हाके, अरुण कांबळे, नंदकिशोर महाजन, सचिन शिवशेट्टे, संजय देशमुख, अमर राऊत, अनिल भोळे आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला.