राशन दुकानांवर दरमहा प्रति मानसी दहा किलो धान्य द्या ! एस.एम.युसूफ़,शेख मुन्तखबुद्दीन यांची केंद्र सरकारकडे मागणी

0
89

राशन दुकानांवर दरमहा प्रति मानसी दहा किलो धान्य द्या !स.एम.युसूफ़,शेख मुन्तखबुद्दीन यांची केंद्र सरकारकडे मागणी


बीड (प्रतिनिधी) – देशभरातील राशन दुकानांवर दरमहा प्रति मानसी दहा किलो धान्य द्यावे. अशी मागणी मुक्तपञकार
एस.एम.युसूफ़ आणि सामाजिक कार्यकर्ते शेख मुन्तखबुद्दीन यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय अन्न व पुरवठामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, केंद्र शासनाकडून देशभरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना दरमहा तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मोफत देण्यात येत आहे. परंतु एका व्यक्तीला मिळणारे हे दरमहा पाच किलो धान्य महिनाभर पुरत नाही. एका व्यक्तीला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दरमहा कमीत कमी दहा किलो धान्य लागते आणि केंद्र शासन फक्त पाच किलो धान्य देत आहे. म्हणजे फक्त पन्नास टक्के धान्य वितरित केले जात आहे.

उर्वरित पन्नास टक्के म्हणजेच अजून पाच किलो धान्य जनतेला बाजारातून प्रचंड महाग दराने घ्यावे लागत आहे. यामुळे केंद्र शासनाकडून देण्यात येणारे हे पाच किलो धान्य कूचकामी ठरत आहे. सध्या केंद्रशासन प्रति मानसी पाच किलो धान्य जरी मोफत देत असले तरी उर्वरित पाच किलो धान्य प्रति मानसी बाजारातून सद्यस्थितीत घेणे भाग पडत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबीयांचे आर्थिक गणित पार विस्कळीत झाले असून अन्नधान्याच्या कमतरतेमुळे देशभरातील जनतेची ससेहोलपट होत आहे. पोटाची खळगी भरून घर संसाराचा गाडा चालविणे दुभर झाले आहे.

अगोदरच गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी, त्यात लावण्यात आलेले लॉक डाऊन. यामुळे उद्योगधंद्यासह गोरगरिबांच्या हाताला कामही मिळेनासे झाले आहे. अशा अवस्थेत केंद्र शासनाकडून राशन दुकानांवर प्रतिमानसी फक्त पाच किलो धान्य मिळत असल्याने अजून पाच किलो धान्य बाजारातून घेण्यासाठी दोनशे रुपये मोजावे लागत आहे. बाजारात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापैकी कोणतेही धान्य प्रति किलो चाळीस रुपयांपेक्षा कमी दरात मिळत नाहीये.

अशा अवस्थेमध्ये राशन दुकानांवर केंद्र शासनाकडून मिळणारे फक्त पाच किलो मोफत धान्य काय कामाचे ? असा प्रश्न पडत आहे. जर केंद्र शासनाला पाच किलो पेक्षा जास्त धान्य मोफत देणे शक्य नसेल तर मग दहा रुपये किलो दराने का होईना दरमहा प्रतिमानसी दहा किलो धान्य केंद्र शासनाकडून देण्यात यावे. सर्वसामान्य गोरगरिबांनी दहा रुपये किलो दराने जरी राशन दुकानावरून धान्य घेतले तरी त्याला धान्यासाठी प्रति मानसी फक्त शंभर रुपये लागतील. जे सध्या शासनाकडून पाच किलो मोफत धान्य मिळाल्यानंतर अजून पाच किलो धान्य बाजारातून घेण्यासाठी दरमहा दोनशे रुपये मोजावे लागत आहे. यात जनतेचे शंभर रुपय वाचेलच शिवाय केंद्र शासनाला मोफत धान्य देण्याची सुद्धा गरज राहणार नाही. केंद्र शासनाला राशन दुकानांवर मोफत धान्य द्यायचेच असेल तर दरमहा प्रति मानसी दहा किलो धान्य वितरित करावे. मोफत देणे शक्य नसेल तर दहा रुपये किलोने द्यावे.

परंतु प्रतिमानसी दहा किलो धान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे लक्ष देऊन दरमहा प्रतिमानसी गहू साडेसात किलो व तांदूळ अडीच किलो चा पुरवठा केंद्र शासनाकडून करण्यात यावा. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि सामाजिक कार्यकर्ते शेख मुन्तखबुद्दीन यांनी निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here