ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आश्रुबा राख यांचे निधन थेरल्यासह पाटोदा तालुक्यावर शोककळा
पाटोदा /प्रतििनधी / पाटोदा/तालुक्यातील थेरला येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आश्रुबा बाबुराव राख यांचे सोमवारी (ता.२० मार्च) रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. अंत्यसमयी त्यांचे वय १०५ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.२१ मार्च) सकाळी नऊ वाजता थेरला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात योगदान देण्याचे काम आश्रुबा राख यांनी केले. सामाजिक जाणीव जपत असल्याने ते सतत २५ वर्षे थेरला गावचे बिनविरोध सरपंच राहिले. दुकानदार या उपाधीने ते परिचित होते. लोकोपयोगी कामे केल्याने सन १९६१ मध्ये त्यांची पाटोदा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली होती. हे पदही त्यांनी त्यांनी गाजवले. पाटोदा तालुक्यातील पहिला दलित मित्र पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.
डी सी सी बँक संचालक, भूविकास बँक संचालक, खरेदी विक्री संघ संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. आष्टी मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राख यांचे ते वडील होतं.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच थेरल्यासह पाटोदा परिसरात शोककळा पसरली आहे. “पठान ए हिंद” मराठी वृत्तपत्र व न्यूज पोर्टल, राख परिवाराच्या या दुःखात सहभागी आहे..