सोनाली म्हात्रे यांनी बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला – डॉ.योगेश क्षीरसागर
बीड दि.04 (प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये आपल्या बीडच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या विद्यार्थीनीने यश संपादन केले. या परीक्षेत त्या महाराष्ट्रातून तिसर्या तर महिलांमधून पहिल्या आल्या आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सोनाली म्हात्रे त्यांनी या अगोदर सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात देखील त्यांनी यश संपादन केले होते. सध्या त्या नागपूर येथे शिक्षणाधिकारी पदासाठीचे प्रशिक्षण घेत आहेत.
याप्रसंगी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर बोलतांना म्हणाले की, परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी कुठलाही नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा, यश नक्कीच प्राप्त होते. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचा सिंहाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांबरोबर पालकांना देखील यशाचे श्रेय जाते. सोनाली म्हात्रे यांच्या यशात त्यांच्या पालकांचा देखील मोठा हातभार आहे.
सोनाली म्हात्रे यांनी अतिशय जिद्दीने अभ्यास करून आणि पालकांच्या कष्टाची जाणीव ठेऊन यश प्राप्त केले असून त्यासाठी त्यांना त्यांच्या आई वडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच या परीक्षेत यश मिळवू शकल्या. त्यांना त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी श्रीनिवास पटेल, परमेश्वर घुमरे, गोविंद कासट, शाम घोरड, बालासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.