हज यात्रेतील व्हीआय पी संस्कृती संपुष्टात; सरकारचा मोठा निर्णय
मुंबई ,प्रतिनिधी/पवित्र हज यात्रेमधील व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता हज यात्रेसाठीचा ‘व्हीआयपी’ कोटा रद्द केला आहे. यानुसार राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य हज यात्रेकरूंना यात्रेची पर्वणी साधता येईल.
भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अल्पसंख्याक मंत्री तसेच हज समितीचे सदस्य यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या जवळपास सर्व व्हीआयपी कोट्या च्या जागा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सर्व सामान्य यात्रेकरूं प्रमाणे हजमध्ये सहभागी होतील. कोणासाठीही ‘विशेष व्यवस्था’ किंवा आरक्षण असणार नाही.
यंदाची यात्रा हि निर्बंधमुक्त
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. कोरोनामुळे प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानेही जगभरातील देशांसाठी प्रवाशांचा कोटाही कमी केला होता.मात्र आता २०२३ च्या हज यात्रेत कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. यंदा ७० वर्षांवरील यात्रेकरूंनाही हजला जाता येणार आहे.