बीड जिल्हा हा कलावंतांची खाण आहे – डॉ.दीपाताई क्षीरसागर
सरला एक कोटी चित्रपटाचा भव्य प्रिमीअर शो संपन्न
बीड दि.23 (प्रतिनिधी)-सरला एक कोटी या चित्रपटाचा भव्य प्रिमीअर शो बीड शहरातील संतोषीमाता ई-स्क्वेअर टॉकीज मध्ये रविवारी सायंकाळी 07 वाजता संपन्न झाला. सिनेमातील कलाकारांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.वेगळ्या विषयाच्या चित्रपट निर्मितीबद्दल मान्यवरांनी निमार्ता-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले.
सानवी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण निर्मित सरला एक कोटी हा चित्रपट सत्य कथेवर आधारीत असून चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन नितीन सिंधू विजय सुपेकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन बीड जिल्ह्याचा पुत्र महेंद्र खिल्लारे यांनी अस्सल मराठवाड्याच्या भाषा शैलीत केले आहे. हा चित्रपट 20 जानेवारी ला सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या चित्रपटात ओंकार भोजने आणि ईशा केसकर यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासह छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, महेंद्र खिल्लारे, वनिता खरात, यशपाल सारनाथ, अभिजीत चव्हाण यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या भव्य प्रिमीअर शो प्रसंगी सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ.दीपाताई क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलावंत आहेत. यातील बरेच कलावंत हे के.एस. के. महाविद्यालयातील आहेत.या चित्रपटाचे संवाद लेखन केलेले महेंद्र खिल्लारे हे देखील के.एस.के.महाविद्यालयातील विद्यार्थी होते. बीड जिल्हा कलाकारांची खाण आहे.
मराठवाडा हा कलाकारांचा बालेकिल्ला आहे. सध्या मराठवाड्यातील लेखकांनी चित्रपट लेखनाची कमतरता भरून काढली आहे. चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कलावंत हे मूळचे नाटकात काम करणारे नाट्य कलावंत आहेत. सिनेमा क्षेत्रातील सर्व मोठे अभिनेते रंगभूमीवरच तयार झाले आहेत. सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या नाट्य क्षेत्रातील कलावंत आता मोठ्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करून महाविद्यालयासह जिल्ह्याचे नाव उज्वल करत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.सरला एक कोटी हा चित्रपट महिलेला केंद्रस्थानी ठेऊन बनवला आहे. स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. समाजात संघर्ष करणारी ही महिलाच आहे.
त्या मुळे महिलांवर आधारित चित्रपट बनवले पाहिजेत. महिलांना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट बनवल्या बद्दल त्यांनी सर्व टीम चे आभार मानले. चित्रपट बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात हाऊसफुल्ल चालावा याबद्दल शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आलेल्या सर्व कलावंतांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाच्या प्रिमीअर शो प्रसंगी चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले कलाकारांसह नाट्यक्षेत्रातील कलाकार, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.