शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !
पेपर नसल्यास अध्यापनासाठी शाळेत हजर राहण्याचे आदेश द्या – एस.एम.युसूफ़
बीड (प्रतिनिधी) – इयत्ता दहावी-बारावी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना पेपर नसल्यास शाळेत अध्यापनासाठी हजर राहण्याचे आदेश द्यावे अशी मागणी मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या इयत्ता १२ वी बोर्डच्या परीक्षा सुरू असून इयत्ता १० वी बोर्डच्या परीक्षाही येत्या ०२ मार्च २०२३ पासून सुरू होत आहे. सध्या सुरू असलेल्या १२ वीच्या परीक्षेसाठी पेपर दिवशी परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक हे त्या दिवशी तर केंद्रावर कर्तव्य बजावत आहेत मात्र ज्या दिवशी पेपर नसेल त्यादिवशी अशा शिक्षकांनी ते कर्तव्यरत असलेल्या शाळेत उपस्थित राहणे कर्मप्राप्त असूनही परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक पेपर नसताना सुद्धा शाळेत कर्तव्य बजावण्यास जात नसल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अशा शिक्षकांच्या अनुपस्थितीने परिणाम होत आहे. ही बाब गंभीर असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनीच याबाबत नोंद घेणे व त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असताना असे होताना दिसत नाही. शिवाय येत्या २ मार्चपासून सुरू होणाऱ्या इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी सुद्धा परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांनी पेपर दिवशीच जावे. पेपर नसल्यास अशा शिक्षकांनी आपल्या मूळ शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन देण्यासाठी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यापूर्वीही दरवर्षी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा वेळी केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक एकदा पहिल्या पेपरला शाळेतून बाहेर पडले की, संपूर्ण परीक्षा संपेपर्यंत पुन्हा अध्यापन देण्यासाठी शाळेत फिरकत नसल्याचे नेहमी दिसून येते. तेव्हा आपण शिक्षणप्रेमी जिल्हाधिकारी असल्याने आता आपणच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक पेपर नसल्यास ते कर्तव्यरत असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन देण्यासाठी पाठविण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी विद्यार्थी व शिक्षणहितास्तव मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.