न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन
अंबाजोगाई/प्रतिनिधि. अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू व्हिजन पब्लिक स्कूल येथील परिसरात भव्य अशा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग यशस्वी करत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रारंभी आधुनिक भारतातील महान वैज्ञानिक सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली.
या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 200 वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण केले. या प्रदर्शनात पाचशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या प्रदर्शनामध्ये सद्यस्थिती, भविष्यात भेडसावणाऱ्या समस्या, मानवी आरोग्य विषयक भेडसावणाऱ्या समस्या, ऊर्जेचा योग्य वापर, विजेची उपकरणे, जलप्रदूषणावरील उपाय, अशा प्रकारच्या विविध प्रयोगांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे प्राचार्य प्रवीण शेळके यांनी आपल्या मार्गदर्शनात आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे हे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले . तसेच विज्ञानाच्या आविष्कारामुळे आपले जीवन सरल व सोयीस्कर झाले आहे त्यामुळे आज आपल्या दैनंदीन व्यवहारात जास्तीत जास्त विज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन देखील याप्रसंगी प्राचार्य शेळके यांनी केले .