ना कुणाशी स्पर्धा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द. यातूनच आत्मसंपादक शेख मुजीब.विश्वास आणि विश्वासार्हता टिकवून ठेवत मिळवलेल्या प्रेमाच्या अथांग सागरात चिंब भिजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे मार्गदर्शक मित्र आणि बंधू सिटीझनचे संपादक शेख मुजीब. मुळात आजची तारीख 7/12 ही मुजीबभाईंसाठीच नव्हे तर सिटीझनसाठी आत्मविश्वासाची ‘ सात / बारा ‘ ठरली आहे. थोडे थोडके नव्हे तर काहीही नसतांना एक दशकांपासून वाचकांचं प्रेम मिळवणं, ते टिकवणं आणि त्याला वाढवणं हे सोपं नाही, मात्र आत्मविश्वासाच्या ताकदीवर मुजीबभाईंनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. म्हणतात ना,
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण अभाळभर उंच उडण्याची ओढ दत्तक घेता येत नाही, ती स्वतःच्या मनगटात आणि कर्तृत्वात असावी लागते हे मुजीबभाईंनी दाखवून दिले. आजपर्यंतच्या प्रवासात अनेक ऊन , पावसाळे डोक्यावर घेत संघर्षातुन वाट काढत एक कर्तबगार आणि तितकाच जबाबदार ‘ सिटीझन ‘ घडवला. दहा वर्षांपूर्वी 10 बाय 10 च्या ऑफिसमधून ‘ सिटीझन ‘ चे काम चालायचे. कधी लाईट आहे तर इंटरनेट नाही. कधी ट्रेस आहेत तर एलपीएफ नाहीत. कधी शाई आहे तर कागद नाही अशा परिस्थितीत मुजीबभाईंनी ‘ सिटीझन ‘ स्टँड केला तोही केवळ आणि केवळ आत्मविश्वास आणि विश्वासार्हतेमुळेच. म्हणूनच आज मुजीबभाई ‘ सिटीझन ‘ आणि आत्मविश्वासाचे ब्रॅण्ड ठरले आहेत. समतोल राखून समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे, प्रत्येकवेळी व्यवस्थेच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका मुजीबभाईंना एका विशिष्ट उंचीवर नेणारी ठरली. सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारा चेहरा तितक्याच अदबीने मोठ्यांचा सन्मान करतो हे विशेष. प्रत्येकाला तितकाच लळा , तेवढाच जिव्हाळा.’ सिटीझन ‘ परिवारातील प्रत्येकजण माझाच या भावनेतून मुजीबभाईंनी सर्वांची मने जिंकली. कमी तिथे मी ही त्यांची खासियत. कधी कोणाविषयी द्वेष , राग , लोभ नाही. दिलेला शब्द कधी चुकणार नाही की हुकणारही नाही. जोडलेली माणसं कधी तुटू देणार की कोणाचं मन दुखेल असं वागणं नाही. शब्दांची माळ आणि आपुलकीची नाळ तुटू न देता ती अधिक घट्ट कशी करता येईल यासाठी तोंडात साखर ठेवून ‘ सात ‘ देण्यात मुजीबभाई सतत पुढेच. ना कधी अहंकार , ना मी पणा , ना मोठेपणा , ना बडेजाव पणा. कितीही संकटे आली त्यावर आत्मविश्वासाने मात करता येते हे दाखवून देत यशाच्या सर्वोच्च दिशेने झेप घेणारी आत्मविश्वासाची ‘ सात / बारा ‘ अशीच लाखो स्क्वेअर फुटाने वाढत राहो ही सदिच्छा! अगदी सरळ साधे आणि सर्वांशी हसतं – खेळत राहणाऱ्या मुजीबभाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुजीबभाईंनी आणखी खूप खूप मोठ्ठं व्हावं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच अल्लाहकडे दुवा.
‘ कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिंमत
कायम मनगटात ठेवा ‘