शासकीय अधिकार्यांचे सारथ्य करणारे विश्वासू सारथी लक्ष्मण पोसू मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन…
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आरोग्य विभागातील वर्ग एक च्या क्लास वन अधिकारी वर्गाचे सारथ्य करणारे विश्वासू सारथी तथा सरकारी वाहन चालक लक्ष्मण पोसू मोरे यांचे बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरी अलिबाग खंडाळे येथे वयाच्या पंच्याऐंशी व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता त्यांचा आप्त परिवार, सगेसोयरे, नातेवाईक मंडळी, त्यांची संपूर्ण खंडाळे भावकी, ग्रामस्थ गडब पेण येथील सहकारी मित्रपरिवार आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, बहीण, भावजय, पुतण्या, भाचा असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी आणि शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११: ०० वाजता त्यांच्या राहत्या घरी अर्थात खंडाळे अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
सरकारी वाहन चालक लक्ष्मण पोसू मोरे यांनी सन सुमारे १९६० ते १९९०,९५ या कालावधीत शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी वर्गाचे सारथ्य करणारे विश्वासू सरकारी वाहन चालक म्हणून इमानेइतबारे काम करून ते सेवा निवृत्त झाले होते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, म्हसळा, पेण इत्यादी तालुक्यात सेवा बजावत असताना त्यांनी शासनाच्या विविध विभागातील अनेक शासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवेसाठी तत्पर राहून त्यांना त्यांच्या सरकारी सेवा कर्तव्यावर वेळेत पोहचवण्यासाठी सरकारी वाहनांचे सारथ्य करून शासनाच्या सरकारी कामकाजात मौलिक आणि महत्वपूर्ण अशी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या सेवा काळात रात्री अपरात्री गरोदरपणात अडलेल्या गोरगरीब महिलांना तसेच प्रसूत महिलांना, रुग्णांना त्यांचा अनमोल जीव वाचवण्यासाठी त्यांना वेळेत अधिक उपचारासाठी अलिबाग, मुंबई या ठिकाणी रुग्णालयात ने-आण करण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळे त्यांनी खर्या अर्थाने शासन सारथी म्हणून काम केले आहे. असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. त्यांच्या कामातील विनातक्रार वक्तशीरपणा आणि नम्रता हा गुण अत्यंत वाखाणण्यासारखा होता. त्यांच्या निधनाने त्यांच्या समस्त मोरे कुटुंबियांवर व आप्त परिवारावर संपूर्ण खंडाळे बौद्धवाडी आणि खंडाळे अलिबाग पंचक्रोशीत दुःखाची शोककळा पसरली आहे.