प्रशासन फक्त राज्यकर्त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधते का ?..
एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा जिल्हाधिकारी यांना सवाल…
बीड (प्रतिनिधी) गेल्या तीन दिवसांपुर्वी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आदिवासी व्यक्ती नामे पवार हे अनेक दिवसांसाठी घरकुलाच्या प्रश्नासंदर्भात उपोषण करत असतांना त्यांची योग्य वेळेवर प्रशासनाने दखल न घेतल्याने थंडीच्या गारव्याने त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे प्रशासन फक्त राज्यकर्त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधते का? असा सवाल एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अॅड.सुर्यकांत पवार यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना पत्रकाद्वारे विचारला आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्रशासन कधीही गंभीर नसते कित्येक लोक आंदोलन उभे करतात व त्याकडे जिल्हाधिकारी यांचे सातत्याने दुर्लक्षच असते. संविधानिक अनुसूची 5 आणि 6 नुसार आदिवासी हा या जल-जमिन- जंगलाचा मालक असे संविधान म्हणते परंतू त्याचाच भाग असलेल्या आदिवासी समाजातील व्यक्तींना घरकुलासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच प्राण गमवावे लागतेय व या बाबीनंतर जर कुठे गेंड्याची कातडी घातलेले प्रशासन जागे होतात आणि जमीन व घरकुलाचा प्रश्न मार्गी लावत आहेत तर आपल्या न्यायालयात मेल्यानंतरच न्याय मिळतो का? असा सवाल देखील अॅड.सुर्यकांत पवार यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी शेवटपर्यंत लढा देणार असून कायदेशीर मार्गाने आदिवासी बांधवांचे प्रश्न निकाली निघाले नाही तर जिल्हाधिकारी साहेब यांच्या विरोधामध्ये खंडपीठ औरंगाबाद येथे जाऊ असा इशारा त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.