तहसील माणगाव आणि खरवली हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने खरवली येथे मानवी हक्क दिन साजरा
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) १० डिसेंबर अर्थात जागतिक मानवी हक्क दिन, या दिनाचे औचित्य साधून तहसीलदार माणगाव प्रियांका आयरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सजा कार्यालय खरवली चे तलाठी अमित उजगरे तसेच नूतन माध्यमिक विद्यालय खरवली या विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक गुळवणी सर, गुळवणी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली व सहकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत खरवली येथे मानवी हक्क दिन जनजागृती फेरी तथा रैली काढण्यात आली. मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने गुळवणी मॅडम यांनी उद्बोधक असे मार्गदर्शन केले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार १९४८ पासून १० डिसेंबर हा ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मानवी हक्क’ हे मूलभूत आणि नैसर्गिक हक्क आहेत, जे माणसाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत. हे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मानवाधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा, धर्म, वय किंवा कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी अंतर्भूत आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिप्राय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर हक्क समाविष्ट आहेत.
मानवी हक्क म्हटलं की ते अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एकाच समाजात राहताना व्यक्तीभिन्नतेमुळे, वेग-वेगळ्या विचारसरणीमुळे मतभेद होणं हे साहजिकच. पण ‘लेट्स ऍग्री टू डिसऍग्री’ या उक्तीनुसार इतरांच्या विचारतलं वेगळेपण मान्य केलं तर या हक्कांचं पालन होऊ शकेल. हुकूमशाही सत्तेमुळे होणारे नागरिकांच्या मानवी हक्क उल्लंघन, निर्वासितांच्या हक्कांचा प्रश्न, मागासवर्गीय व अल्पसंख्याका होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी विश्वरत्न, महामानव घटनातज्ज्ञ तथा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या तथा संविधानाच्या माध्यमातून देशातील शोषित पिडीत समाज घटकांना मानवी हक्क प्रदान केले. त्यामुळे आज देशातील सर्व नागरिक सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत.