दि. 13 डिसेंबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचा वाढदिवस
युवकांमध्ये राजकीय आत्मविश्वास पेरण्याचे काम महेबुब शेख यांचे सुरू आहे.
संघटन तालुका पातळीवर मजबूत केले तरच जिल्हा व राज्य पातळीवर पक्षाचा प्रभाव वाढेल. अशी मांडणी करत शरद युवा ‘संवाद यात्रा’ काढून तब्बल अडीचशे तालुक्यात जाऊन गाव पातळीवरील युवकांमध्ये राजकीय आत्मविश्वास पेरण्याचे काम महेबुब शेख यांचे सुरू आहे. कायदा पदवीपर्यंतचे शिक्षण, स्वभाव मृदू, प्रसंगी प्रचंड आक्रमक, उत्तम प्रतिवाद, पराकोटीची निष्ठा, भूमिकेवर ठाम यामुळे अवघ्या पस्तीस वर्षाचा हा तरुण राष्ट्रवादी पक्ष संघटनेत युवकांचा चेहरा बनला. राजकीय पार्श्वभूमी आणि थेट नेतृत्वाची तोंड ओळखही नसताना केवळ पाच मिनिटीच्या भाषण संधीने तालुका पातळीवर काम करणार्या तरुणाला शरद पवार व जयंत पाटील यांनी बोलावून घेऊन तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.
बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या जागृत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रस्थापित राजघराण्यांचाच प्रभाव असल्याने सामान्य कुटुंबातील तरुणांना अपवादानेच संधी मिळते. अशा परिस्थितीत शिरुरकासार या कायम दुष्काळी तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील शेतकरी कुटुंबातील महेबुब शेख यांची तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तेंव्हा आश्चर्याचाच धक्का होता. कायद्याच्या पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महेबुब यांचा राजकीय प्रवेश शालेय जीवनातच झाला होता. काँग्रेस पक्षातून शरद पवारांची हकालपट्टी झाल्याची बातमी दुरदर्शनवर सकाळी घरात बघत असताना वडील शेख इब्राहीम बाशुमियॉ यांनी महाराष्ट्रातल्या माणसाला मोठेच होऊ दिले जात नाही अशी खंत व्यक्त केली आणि अवघ्या सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या महेबुब याच्या मनावर महाराष्ट्राचा माणूस म्हणजे शरद पवार हे कोरले गेले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरुवात केली. विद्यार्थी संघटनेत शाखा अध्यक्ष झाला. मात्र तालुकाध्यक्ष निवडीच्या वेळी वरिष्ठांनी जिल्हा उपाध्यक्ष पदावर आणि जिल्हाध्यक्षपदाच्या वेळीही प्रदेश उपाध्यक्ष पदावर बोळवण केली. वीस वर्ष स्थानिक पातळीवर काम करत असताना वाचन, भाषण आणि संघटन यातुन महेबुब यांनी ओळख निर्माण केली.
प्रदेशस्तरावर संधी मिळाल्यानंतर जवळपास बावीस जिल्ह्यात निरीक्षक म्हणुन काम करताना आणि तालुका पातळीवर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात औरंगाबादसह अनेक ठिकाणी मोर्चे काढले. ‘झेप’ अभियानाच्या माध्यमातून पक्षातील नवीन उपक्रम सुरू केला. मात्र स्थानिक पातळीवरील काम हे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या खात्यात जमा होत असल्याने पक्ष नेतृत्वाची मात्र थेट ओळख कधी झाली नाही. भाजपचे सरकार असताना मंत्रालय, वर्षा निवासस्थान, भाजप पक्ष कार्यालयावर संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढला तेंव्हापासून महेबुब यांचा चेहरा दिसू लागला. मात्र 11 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांसमोर मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त पाच मिनीट भाषण करण्याची संधी मिळाली आणि महेबुब यांच्या राजकीय जीवनाला कलाटणीच मिळाली. शरद पवार, जयंत पाटील यांनी बोलावून घेऊन पक्ष संघटनेत काय काम केले? आणि भविष्यातील कल्पना जाणून घेतल्या आणि थेट राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्षपदीच नियुक्ती केली. शरद पवार यांना ईडी ची नोटीस आल्यानंतर ईडी कार्यालयावर महेबुब यांच्या नेतृत्वाखाली थेट आंदोलन केले. वेगवेगळ्या आंदोलनामुळे जवळपास तेवीस पेक्षा अधिक केसेस त्यांच्यावर दाखल झाल्या. शरद पवार यांच्या ‘लोक माझे संगती’ या पुस्तकाने प्रभावित होऊन महेबुब यांनी विविध विषयांचा अभ्यास करुन पक्ष नेतृत्वाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा, प्रतिवाद करण्याचा गुण विकसित केला. तरुणांना संघटनेत जोडण्यासाठी राज्यभर प्रवास करणे, सदैव त्यांच्यासाठी उपलब्ध असणे. यातुन त्यांनी संघटन वाढवले. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर तरुणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळण्यासाठी ऑनलाईन व्यावसायीक प्रशिक्षण, वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि आयटी विभाग निर्माण करुन थेट गाव पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी संपर्क निर्माण केला आहे. शिरुर नगरपंचायतीत विरोधी गटाचे दहा नगरसेवक फोडून सत्ता मिळवून महेबुब यांनी राजकीय चुणूक दाखवली होती. तर दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव मांडल्यानंतर महेबुब शेख यांचा चेहरा चर्चेत आला. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आता तालुका पातळीवर कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि कुस्तीच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे.
मागील तीन महिन्यांपासून शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून अडीचशे तालुक्यात जाऊन तरुणांमध्ये राजकीय आत्मविश्वास पेरला असुन साडेतीनशे तालुक्यात ही यात्रा पोहोचणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यात संवादासाठी जाणारा राष्ट्रवादीतील महेबुब हा एकमेव युवक प्रदेशाध्यक्ष. यापूर्वीचे युवक आघाडीच्या अध्यक्षांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली आहे. त्याच दृष्टीकोणातून महेबुब शेख यांचे विधान परिषदेचे लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही पार्श्वभूमी नसताना दुष्काळी भागातून येऊन प्रस्थापितांच्या पक्षात आपले भक्कम स्थान निर्माण करण्याचा महेबुब यांचा प्रयत्न आणि तालुका पातळीवर संघटन मजबूत करण्याचे धोरण राजकारणात येऊ पाहणार्यांसाठी आशेचा किरण आहे.
-वसंत मुंडे, बीड.