बीडमध्ये होणार्या कृषी महोत्सवाचा लाभ घ्याशिवसेना जिल्हाप्रमुख -: अनिल जगताप यांचे आवाहन
बीड, दि.२६ (प्रतिनिधी)- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या वतीने दि.२९, ३०, ३१ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय मराठवाडास्तरीय विभागीय कृषी महोत्सव व १ जानेवारी रविवार रोजी श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या भव्य शेतकरी सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कृषी महोत्सवाचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.
जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी रविवारी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या मंडप आणि नियोजनाची पाहणी केली. या महोत्सवात विनामुल्य कृषीदिंडी, प्रदर्शन, कृषी तज्ञांचे चर्चासत्र, संस्कृती दर्शन, विषमुक्त शेती, वनौषधी, रानभाज्या महोत्सव, देशी बियाणे, मोफत आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती शिबीर, शेतकरी वधू-वर परिचय मेळावा, स्वयंरोजगार मेळावा, खाद्य संस्कृती, सण उत्सव मांडणी, बारा बलुतेदार मांडणी, आदर्श गावसंकल्पना, पशुधन गोवंश, आधुनिक तंत्रज्ञान-दुग्ध व्यवसाय व व्यवस्थापन, ग्रामसेवक-सरपंच मांदियाळी, बालसंस्कार व युवा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च उपक्रम होणार असून या कृषी महोत्सवाची सांगता परमपूज्य गुरूमाऊलींच्या उपस्थितीत भव्य शेतकरी सत्संग मेळाव्याने होणार आहे.
या मध्ये आधिदैविक, आधिभौतिक, अध्यात्मिक, शेती, आरोग्य, दैनंदिन, प्रापंचिक समस्या, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या ग्रामाभियानांतर्गत अठरा विभागावर अमृततुल्य हितगुज लाभणार आहे. हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे संपन्न होणार असून या कृषी महोत्सवाचा बीड जिल्ह्यातील शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. यावेळी सोबत बीड येथील स्वामी समर्थ सेवेकरी सोबत होते.