सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते वाळवा पंचायत समितिचे माजी सभापती जनार्दन पाटील काकांचे दु:खद निधन
इस्लामपूर दि.२६ प्रतिनिधी /इकबाल पीरज़ादे/सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते,वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती, राजाराम बापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे सोमवारी दुपारी बेळगाव येथे निधन झाले. येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता कासेगाव (ता.वाळवा) येथील त्यांच्या गावातील वाड्यासमोर अंत्यदर्शना साठी ठेवण्यात येणार असून कृष्णा नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ते लोकनेते राजारामबापू पाटील यांचे पुतणे,माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांचे चुलत भाऊ,तर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,युवा नेते देवराज पाटील,जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांचे वडील होत. जनार्दनकाका पाटील यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनास सुरुवात करून त्यांचे वडील माजी सरपंच,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्व.यशवंतअण्णा पाटील यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. प्रथम ते स्व.बापूंच्याबरोबर संपूर्ण राज्यात सावली सारखे वावरले आहेत.
त्यांनी कासेगावचे सरपंच,जिल्हा परिषदेचे सदस्य,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि वाळवा पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे. त्यांच्या साडे सात वर्षाच्या सभापती पदाच्या कारकिर्दीत वाळवा पंचायत समितीने सातत्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ते सध्या राजारामबापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पहात होते. ते पाटील परिवाराचे कुटूंब प्रमुख होते. त्यांनी कासेगाव व कासेगाव परिसरातील गांवे व सर्व सामान्य माणसांशी एक कौटुंबिक नाते निर्माण केले होते. कासेगाव,परिसरातील गांवे व तालुक्या च्या विकासात मोलाचे योगदान केलेले आहे. ते एक मृदु स्वभावाचे कणखर नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचीत होते.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा,चार मुली,सून,नातू,चुलत भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० कासेगाव (ता.वाळवा) येथे केले जाणार आहे.