गुरुमाऊलींकडून शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर…
बीडमध्ये चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मराठवाडा कृषी महोत्सवाचे उद्घाट
बीड दि.29 (प्रतिनिधी)ः- संस्कार, संस्कृती आणि कृषी यासाठी गुरू माऊलींच्या माध्यमातून काम केले जात आहे. अध्यात्माबरोबरच समाजाच्या समस्याही सोडविण्याचे काम होत आहे. गुरू माऊली आण्णासाहेब मोरे यांनी शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले आहे. सेंद्रीय खतांचा वापर वाढावा यासाठी अधिक भर ते देतात. त्यामुळेच बीड येथे आयोजित केलेला हा मराठवाडा कृषी महोत्सव शेतकर्यांसाठी महत्वाचे माध्यम ठरला आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. तर राज्यात 36 जिल्ह्यांसह अन्य राज्यातही गुरू माऊलींचे विचार प्रसारित करण्याचे काम होत असून अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ उभी करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हे काम पोहोचविले जात आहे. कुठलीही अपेक्षा न करता सेवा करतांना अंधश्रध्दा न ठेवता वैज्ञानिक दृष्टीकोनातून श्री स्वामी समर्थांची सेवा केली जाते. मानवता हाच धर्म मानून गुरू माऊली सामान्यांच्या समस्या सोडवतात.
बळीराजाला चांगले दिवस यावेत, त्याला मुळ शेतीचे तंत्रज्ञान मिळावे आणि त्यातून उत्पादीत होणारे अन्नधान्य जनतेला मिळावे यासाठी सेवा केंद्रातून प्रबोधन केले जात असल्याची माहिती गुरूपीठ त्र्यंबकेश्वराचे प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत मोरे यांनी दिली. बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर गुरूवार दि.29 डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे वतीने आयोजित भव्य मराठवाडा कृषी महोत्सवाचे उद्घाटन गुरूपीठ त्र्यंबकेश्वराचे प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पूर्वी बीड शहरातील भाग्यनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रापासून शोभायात्रेचा शुभारंभ झाला. या शोभा यात्रेने बीडकरांचे लक्ष वेधून घेतले.शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा कृषी महोत्सव स्थळी पोहोचली. दरम्यान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर खा.ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,अरूण डाके, सखाराम मस्के,प्रा.गोविंद साळुंके आदिंची उपस्थिती होती.
या प्रसंगी पुढे बोलतांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, प.पु.गुरू माऊलींच्या आशिवार्दाने मराठवाडा कृषी महोत्सव होतोय ही मोठी उपलब्धी आहे. यापूर्वीही कृषी महाविद्यालयात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अध्यात्माबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या सोडविण्याचे काम श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक मार्ग दिंडोरीच्या वतीने केले जात आहे. श्री स्वामी समर्थांची सेवा करत योग्य आणि सद् विचाराचा मार्ग प्रत्येकाना स्विकारावा. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचा संदेश जातो असे ते म्हणाले. दरम्यान या कृषी महोत्सवा अंतर्गत दि.29 डिसेंबर 2022 ते 01 जानेवारी 2023 दरम्यान विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच मराठवाड्यातील शेतकर्यांना तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात जास्त प्रमाणात तसेच शेंद्रीय पद्धतीने कसा प्रकारे शेतीत अधिक उत्पन्न मिळवीता येईल यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांना परमपूज्य गुरूमाऊलींचा अण्णासाहेब मोरे यांचे रविवार दि.1 जानेवारी 2023 रोजी शेतकरी सत्संग होणार असून जिल्ह्यातील जास्तीत शेतकरी बांधवानी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अनिल जगताप, संतोष सोहनी, शिवाजीराव अडसुळ, शिवाजी कापसे, बजरंग सोनवणे, सौ.भावनाताई नखाते, नितीन धांडे, शफिक पटेल, शुभम धुत यांच्यासह महिला-पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.