कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी .अल्पभूधारक शेतकऱ्यांने आत्महत्या केलेल्या राहत्या घरी सांत्वन भेट..
सोयगाव (प्रतिनिधी यासीन बेग) सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील दीपक जनार्धन सुस्ते व जंगलातांडा येथील अनिल मदन चव्हाण या अल्पभूधारक शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार सोयगाव दौऱ्यावर असताना त्यांनी जंगलातांडा येथील अनिल चव्हाण व जरंडी येथील दीपक सुस्ते यांच्या राहत्या घरी सांत्वन भेट देऊन दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पीडित चव्हाण व सुस्ते परिवाराशी संवाद साधून त्यांना धीर दिला. पीडित चव्हाण व सुस्ते परिवाराला शासनाच्या मदतीसह वयक्तिक मदत देण्याची मंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्वाही दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून मदत दिल्या जात आहे. नुकसानग्रस्तांना पीक विमा देखील मिळणार आहे. दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफी देखील देण्यात आली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सरकार अनुदान देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा. संकटे येतात संकटे जातात , मात्र आत्महत्या हा अंतीम पर्याय नाही. आत्महत्या केल्याने आपल्या परिवाराच्या समस्येत उलट वाढ होते असे स्पष्ट करीत कोणत्याही शेतकऱ्यांने आत्महत्या करु नये असे आवाहन मंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सिल्लोड न.प.गटनेता नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, श्रीराम पाटील, समाधान तायडे, बाबू चव्हाण, वसंत राठोड, वसंत चव्हाण आदिंसह जरंडी व जंगलातांडा येथील गावकरी व शोकाकुल परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.